नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणी आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. खर्गे यांना आज सोमवारी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी खर्गे यांची नॅशनल हेरॉल्ड भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी केली.


नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र सन १९३८ मध्ये सुरू करण्यात आले होते. पंडित नेहरू यांनी या वृत्तपत्राचा वापर स्वातंत्र्ययुद्धात केला होता. नेहरुंनी १९३७ मध्ये असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीमार्फत तीन वर्तमानपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये हिंदीत नवजीवन, उर्दूमध्ये कौमी आवाज आणि इंग्रजीत नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रांचा समावेश होता. सन २००८ नंतर असोसिएटेड जर्नलने ही वृत्तपत्रे न छापण्याचा निर्णय घेतला. असोसिएटेड जर्नलवर ९० कोटी रुपये कर्जाचा बोजा असल्याचे नंतर उघड झाले.

सन २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हे प्रकरण उजेडात आणले होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे, सॅम पित्रोदा यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षनिधीतून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची कंपनी यंग इंडियाला ९० कोटी रुपये उधार दिले होते. या पैशातून राहुल आणि सोनिया यांच्या कंपनीनं नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र चालवणारी असोसिएटेड जनरल ही कंपनी खरेदी केली होती. यानंतर या कंपनीची ५ हजार कोटी रुपयांची संपत्ती अद्यापही गांधी कुटुंबियांकडे असल्याचे सांगितले जात आहे. २०१४ मध्ये ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आज या प्रकरणात ईडीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केली.

Share