मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचा छापा

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण ७ ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे ५० कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

अनिल परबांवर आरोप आणि छापेमारी
अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सरकारी आहेत.परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसाॅर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

Share