देशात अद्याप मंकीपॉक्सची एकही रुग्ण आढळलेला नाही -आरोग्य मंत्री

मुंबई :  मंकीपॉक्स या आजाराची भीती संपूर्ण जगाला लागली आहे. राज्य सरकारने देखील या बाबतची खबरदारी बाळगली असून अद्याप भारतात मंकीपॉक्सची एकही रुग्ण आढळलेला नाही. या रोगाचा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिका या देशातून सुरू झाला आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये देखील या आजाराचे रुग्ण सापडतात आहेत. मात्र अद्याप मंकीपॉक्सची रोगाचे रुग्ण आपल्या देशात नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

मंत्री टोपे म्हणाले की, मंकी पॉक्स हा विषाणू हवेतून प्रसारित होत नाही. ह्युमन टू ह्युमन टच किंवा ॲनिमल टू ह्युमन टच अशा माध्यमांतूनच तो पसरतो. पुरळ येणे, ताप येणे अशी या विषाणूची लक्षणे आहेत. चार आठवड्यांपर्यत या विषाणूचा संसर्ग राहू शकतो. या विषाणूचा मृत्यू दर १ टक्क्यांपासून ते १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असे अहवालातून सांगण्यात आले आहे. एक-दोन दिवस ताप आणि पुरळ येण्याच्या दरम्यान या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होण्याची शक्यता असते, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

काळजीचे कारण नाही

एकही रुग्ण आपल्या येथे आढळलेला नाही, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही, असे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या देशात या आजाराचे रूग्ण आढळले आहेत त्या देशातून येणाऱ्या लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग सुरू केले आहे. या स्क्रिनिंगच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस आढळल्यास त्या व्यक्तीचे स्वॉब घेऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला (national institute of virology) पाठवत आहोत.

रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड

कस्तुरबा गांधी रुग्णालयात या आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड आरक्षित ठेवला आहे. डॉक्टरांची नेमणूक केली आहे. या आजाराशी लढण्याची निश्चितच तयारी ठेवली आहे. जिल्ह्याजिल्ह्यामध्ये याबाबात जनजागृती केली जात असून सतर्कता म्हणून ही माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिली असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

Share