नवी दिल्ली : नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतिश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. सकाळपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे. मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले.
ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही दिलेल्या पुराव्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्या घरावर देखील ईडीच्या थाडी पडतील, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे राऊतांनी म्हटले. तसेच ईडीचा वापर पाळलेल्या गंडुसारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.