नागपुरातल्या ईडीच्या कारवाईवर पटोलेंची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा कायम आहे. आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीष उके यांच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला आहे. त्यानंतर सतिश उके यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणावर हल्ला चढवला आहे. उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले यांनी ट्वीट केलं आहे.

नाना पटोले यांनी ट्वीट मध्ये म्हटलं की, मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.

वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं उके यांना ताब्यात घेतलं. सकाळपासून पाच तास चौकशी करण्यात आली. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप सतीश उके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Share