मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे ३५ आमदार हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. अशात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
दरम्यान, याआधी नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावं, असा पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तर आगामी नवीन सरकारमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, असा दुसरा प्रस्ताव आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहील, असा तिसरा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचं एका वृत्तवहिनीने दिली आहे.