पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या १ मे रोजी सिंहगडावर इलेक्ट्रिक बस (ई-बस) धावणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
सिंहगडावर सोमवार (२ मे) पासून इलेक्ट्रिक बसची नियमित वाहतूक सुरू होणार असल्याने दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना प्रवेश मिळणार नाही. इलेक्ट्रिक बसच्या नव्या पर्यायामुळे सिंहगड घाट रस्ता वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहे. तसेच हवा प्रदूषणही कमी होणार आहे. सुट्ट्यांच्या दिवशी घाटरस्त्यात लागणाऱ्या वाहनांच्या रांगा, तासन्तास रेंगाळणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी वन विभागाने सिंहगडावर जाणारी खासगी वाहने बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. घाट रस्त्यावर ‘पीएमपी’ने केलेल्या ई-बसच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. गेल्या दोन महिन्यांत पर्यटकांच्या गाड्यांचे पार्किंग, इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग स्टेशन आणि बसच्या वेळांचे नियोजन झाले आहे. यापुढे पर्यटकांना गडाच्या पायथ्याला गाडी लावून बसने सिंहगड सर करता येणार आहे.