‘त्या’ फेसबुक पोस्टवरून दिग्पाल लांजेकरांवर संतापले अमोल कोल्हे

मुंबई : काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुक अकाउंटवरून ‘शेर शिवराज’ या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टवर अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला असून, यासंबंधित एक व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला.

या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे म्हणाले की, ‘एका दिग्दर्शकाने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांचा हेतू सिनेमाचं प्रमोशन करणं हा असेल; पण माझा त्या कलाकृतीशी कोणताही संबंध नसताना अप्रक्षरित्या त्या पोस्टमध्ये माझं नाव घेण्यात आलं. हा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने करण्यात आला म्हणून मी पोस्ट करणं मला गरजेचं वाटतं. अनेकदा अशा गोष्टींकडे कानाडोळा केला पाहिजे; पण वारंवार जेव्हा एक गोष्ट घडते तेव्हा ते खोटे आरोपही खरे वाटू लागतात.’

‘दैनंदिन मालिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज मीच तो असं समजणारा आणि त्यासोबतच माझ्या आडनावाचा वापर करून आक्षेपार्ह रितीने अनेक गोष्टी करण्यात आल्या. मी माझ्या प्रत्येक व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. असं असतानाही अशा पोस्ट लिहिल्या जात असतील हे फार वाईट आहे. अशा पद्धतीच्या पोस्ट लिहून त्या शेअर करून माझी रेषा मोठी हे दाखवण्यासाठी दुसऱ्याची रेषा पुसून टाकण्याचा जो प्रयत्न सुरू आहेत तो दुर्दैवी आहे आणि ही माझी संस्कृती नाही. आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले.. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!’ असे अमोल कोल्हे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/tv/Cc78h8tKhyV/?utm_source=ig_web_copy_link

अमोल कोल्हे यांनी कशावर घेतला आक्षेप?
दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुकवर ‘शेर शिवराज’ या सिनेमाचे कौतुक करणारी एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये एक मुद्दा हा अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हे यांच्याविरोधात होता. ‘टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा..’ याच मुद्द्यावर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला.

दिग्पाल लांजेकर यांनी मागितली माफी
यानंतर दिग्पाल लांजेकर यांनीही एक व्हिडीओ पोस्ट करून अमोल कोल्हे यांची जाहीर माफी मागितली. या व्हिडीओमध्ये दिग्पाल म्हणाले की, ‘खासदार अमोल कोल्हे यांची एक पोस्ट मी पाहिली. माझ्या फेसबुक पोस्टवर त्यांनी आपलं मत मांडलं. ही पोस्ट माझ्या एका चाहत्याने केली होती. अनेक चाहते ‘शेर शिवराज’च्या प्रदर्शनानंतर पोस्ट शेअर करत होते, टॅग करत होते. यात अनवधानाने सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट शेअर केली गेली; पण जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा काही मिनिटांत ही पोस्ट उडवली गेली; पण याचा स्क्रीन शॉट कोणी काढला असेल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवला असेल.’
‘मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तम भूमिका साकारणाऱ्या इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. तसेच कोणत्याही प्रकारे त्यांचा अशाप्रकारे अनादर करण्याची माझी कधीच भूमिका नसेल हे जाणीवपूर्वक केलं गेलेलं नाही; पण तरीसुद्धा मी त्यांची माफी मागतो.’

Share