अहमदनगर : इतरत्र परिस्थिती काहीही असली तरी नगर जिल्ह्यात आपण शिवसेनेसोबत राहणार आहोत. यामुळे भले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल; परंतु आपण शिवसेनेला साथ देणार, असे वक्तव्य भाजपचे नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.
पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते. या कार्यक्रमास शिवसेनेचे नेते, माजी आमदार विजय औटी यांच्यासह भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. राज्यात भाजप आणि शिवसेनेत टोकाचा राजकीय संघर्ष निर्माण झालेला असताना नगरमध्ये मात्र भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळीच भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता टीका केली, तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे कौतुक केले. डॉ. विखे पाटील म्हणाले, मी खासदार म्हणून निवडून येण्यात येथील शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. ‘मातोश्री’च्या विरोधात, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही मी कधी बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे.
संकटाच्या वेळी नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही
डॉ. विखे पाटील म्हणाले, माझे काही कार्यकर्ते शिवसेनेत गेले. मला त्याची खंत वाटली नाही. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजप आणि पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. ही हिंमत माझ्यामध्ये आहे, कारण मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल.
मागील काळात पारनेर तालुक्यात शिवसेनेचा आमदार असताना मोठी कामे झाली. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो, असेही ते म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांना टोला
शिवसेनेचे कौतुक करताना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. या दोघांमध्ये एकदा लोकसभेत जुगलबंदी रंगली होती. त्यावेळी डॉ. विखे पाटील यांनी खाल्ल्या मिठाला जागावे, असे खा.सुळे म्हणाल्या होत्या. तो धागा पकडून याप्रसंगी डॉ. विखे पाटील म्हणाले, कोणी तरी म्हटले होते की, आम्ही खाल्ल्या मिठाला जागत नाही. मी सांगतो की, शिवसेनेने आम्हाला केलेल्या मदतीची जाणीव ठेवून मी शब्द देतो की, यापुढील काळातही नगर जिल्ह्यातील शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही. कारण, आम्ही खाल्ल्या मिठाला जागतो. मात्र, जे कुटुंब आजपर्यंत कोणाच्याच मिठाला जागले नाही, त्यांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही, असेही डॉ. विखे म्हणाले.