शिवसेनेचं नियोजन चुकलं, एक फोन सुद्धा केला नाही – देवेंद्र भुयार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊतांच्या या आरोपांवर देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, आम्ही संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली असा त्यांनी सवाल केला आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे की, मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसोबत काम करत असून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती, असंही भुयार म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले की, संजय राऊत यांचं चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे. मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचं मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिलं आहे. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे मतदान केले, असं भुयार यांनी स्पष्ट केलं.

पवारांची घेणार भेट

भुयार हे आज दुपारी साडे चार वाजता सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेणार आहेत. याविषयी बोलताना भुयार म्हणाले, प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेले आहे. त्यामुळे आमच्याबद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही, असं पवारांना सांगणार असल्याचे भुयार म्हणाले.

भाजपला कधीच मतदान करणार नाही

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल. हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही, तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही, असं भुयार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री वेळ देत नाही

मुख्यमंत्री कधीच भेटत नाही. अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाही. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार. मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत असल्याचे भुयार म्हणाले.

Share