सत्तासंघर्षातही आमदार देवेंद्र भुयार यांनी उरकला साखरपुडा

अमरावती : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असतानाच अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे बहुचर्चित अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी कुठलाही गाजावाजा न करता आज एका कौटुंबिक सोहळ्यात साखरपुडा उरकून घेतला आहे. लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा आज बुधवारी (२९ जून) दर्यापूर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात पार पडला. आ.भुयार यांची होणारी वधू दर्यापूर येथील असून, मोनाली दिलीपराव राणे हे त्यांचे नाव आहे. उद्या गुरुवारी विधानसभेत बहुमत चाचणी असल्याने आमदार भुयार हे आजच मुंबईसाठी रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्या एका मताच्या जोरावर शिवसेना नेते संजय राऊत यांना भिडणारे आणि अजितदादा पवार सांगतील ती पूर्वदिशा म्हणणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संपूर्ण राज्यात चर्चिले गेले.

देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. जवळपास १० वर्षे त्यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत काम केले. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भुयार यांचे कर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना मोर्शी मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले. आश्चर्य म्हणजे भुयार यांनी तत्कालीन कृषिमंत्री व भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांचा पराभव केला आणि ते निवडून आले. एका क्षणात ते महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते एकमेव आमदार होते. पक्षसंघटनेत विशेष लक्ष देत नसल्याच्या कारणावरून राजू शेट्टी यांनी भुयार यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यादरम्यान आ. भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. आ. भुयार हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही शिवसेनेला मतदान न केल्यामुळे संजय पवार यांचा पराभव झाल्याचा आरोप केला होता. राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या मतदानाबाबत खा.संजय राऊत यांनी आक्षेप व्यक्त केला असताना आपण अजित पवारांशी प्रामाणिक आहोत, असे सांगून आ. भुयार यांनी खा. राऊत यांनासडेतोड उत्तर दिले होते. ज्यामुळे ते संपूर्ण राज्यात चर्चेत आले होते. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक निकालाचा धुराळा खाली बसत नाही तोच राज्यात सत्तासंघर्ष सुरू झाला. राजकीय वातावरण तापले असतानाच आज आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा मोठ्या उत्साहात पडला. ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असली तरी भुयार यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नवा जोडीदार लाभला आहे.

Share