सुरवात तुमची असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का?

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल केला असून, परब यांच्याशी संबंधित राज्यातील ७ ठिकाणांवर ‘ईडी’ने आज सकाळी छापे टाकले आहेत. यानंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ईडीने केलेल्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, सत्ता मिळत नाही मग घरगडी कामाला लावला का? तुमचा पहाटेचा टाईम फ्लॅाप होतो हे विसरले का? मिरा भाईंदरच्या फरार आमदाराकडे करोडो सापडले तिथली वाट ED विसरले का? सुरवात तुमची जरी असली तरी शेवट नेहमी शिवसेना करते हे विसरलात का? असे सवाल दीपाली सय्यद यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून या कारवाईवर निशाणा साधला.

मुंबई पाठोपाठ पुण्यात छापेमारी

ईडीकडून अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये अनिल परब यांच्या घराचाही समावेश आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे.

सचिन वाझे याने ईडीला माहिती दिली होती की, अनिल परब यांना त्याने एक मोठी रक्कम दिली होती. याशिवाय पोलिसांच्या बदल्यांसाठी पैसे घेतले होते. तसेच काही कंत्राटदारांकडूनही वसुलीही करण्याची जबाबदारी अनिल परब यांनी सचिन वाझेला दिली होती. त्या प्रकरणात चौकशी आता ईडी करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ही धाड टाकण्यात आली आहे.

अनिल परबांवर आरोप आणि छापेमारी

अनिल परब हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात किरीट सोमय्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केली होती. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचाही आरोप करण्यात येत आहे. याच अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.

Share