अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आरोपी असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असलेल्या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. सचिन वाझे यांनी याबाबत विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सचिन वाझेंनी आरोपींविरोधात आपल्याकडे असणारी सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली असून, यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही समावेश आहे.

सीबीआयने माफीचा साक्षीदार होण्यासाठी सचिन वाझेंनी केलेला अर्ज मान्य केला आहे. सचिन वाझेंना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सर्व तरतुदी तसेच कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जावर ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

‘ईडी’ने सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतरांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.फेब्रुवारी महिन्यात सचिन वाझेंनी ‘ईडी’चे सहाय्यक संचालक तसीन सुल्तान यांना आणि तपास अधिकाऱ्याला पत्र लिहिले होते. यामध्ये आपण माफीसाठी आपल्याकडे असणारी सर्व माहिती उघड करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणात ४ एप्रिलला सचिन वाझे, अनिल देशमुख आणि इतर दोघांना अटक केली होती. याच प्रकरणात सचिन वाझेंनी बुधवारी कलम ३०६ अंतर्गत आपले वकील रौनक नाईक यांच्यामार्फत माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे.

सचिन वाझेंनी आपल्या अटकेनंतर सीबीआयने पूर्णपणे तपास केला असून आपण त्यांना तपासात सहकार्य केल्याचे म्हटले आहे. सचिन वाझेंनी तपास अधिकाऱ्यांना आपण स्वेच्छेने कबुली देण्यास तसेच आपल्याकडे असणारी सर्व माहिती, पुरावे देण्यासाठी तयार असल्याचेही म्हटले आहे. यानंतर न्यायदंडाधिकार्‍यांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. ईडीला दिलेल्या पत्रातही सचिन वाझेंनी आपण स्वेच्छेने कबुली देण्यास तयार असल्याचे म्हटले होते. त्यांनी सीबीआय आणि ईडी दोघांनाही आपण अनिल देशमुखांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्तराँना कोरोना काळात वेळमर्यादेपेक्षा जास्त काळ सुरू ठेवण्यासाठी पैसे गोळा केल्याचे सांगितले होते.

काय आहे नेमके प्रकरण?
दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) २१ एप्रिल २०२१ रोजी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्या आधारावर ११ मे २०२१ रोजी ‘ईडी’ने देशमुख यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (मनी लाँड्रिंग) गुन्हा दाखल केला. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेंनी बार मालकांशी बैठक आयोजित करून डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये ४ कोटी ७० लाख रुपये जमा केल्याचा आरोप आह़े अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार त्यांचा खासगी सचिव कुंदन शिंदेला जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीत दोन हफ्त्यांमध्ये रक्कम दिली, असा दावा वाझेंनी केला होता. देशमुख यांच्या नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यावर ४ कोटी १८ लाख रुपये जमा झाले होते. ते दिल्लीतील चार कंपन्यांमार्फत जमा झाले होते. बार मालकांकडून घेतलेली ४ कोटी ७० लाख रुपयांची रक्कम ही तीच असल्याचा ‘ईडी’ला संशय असून देशमुख यांच्यामार्फत त्यांच्या मुलाकडे व तेथून हवालामार्फत दिल्लीतील कंपनी आणि पुढे देशमुख यांच्या शिक्षण संस्थेत ही रक्कम जमा झाल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

‘ईडी’ने देशमुख व कुटुंबियांचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष नियंत्रण असलेल्या २७ कंपन्यांची ओळख पटवली आहे. या कंपन्यांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ‘ईडी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी देशमुख यांना अटक केल्यानंतर डिसेंबरमध्ये ‘ईडी’ने याप्रकरणी सुमारे सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सध्या देशमुख कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

Share