आघाडीत बिघाडी! पालकमंत्री आदितींना बदलण्याची शिवसेनेची मागणी

रायगड- रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचे मतभेद दिसून येत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदलण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पालकमंत्री आदिती तटकरे मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. रायगडसाठी शिवसेनेचा पालकमंत्री हवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रायगडचे पालकमंत्री बदलासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार एकवटले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत घेत राष्ट्रवादीचे पक्षाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली आहे. आता भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले होते. त्याचवेळी शिवसेनेवर टीका केली. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता आहे.

महाडचे आमदार भरत गोगावले यांनी नगरपंचायत निवडणुकीनंतर पत्रकार परीषद घेतली. राष्‍ट्रवादीच्‍या आदिती तटकरे या मनमानी कारभार करत आहेत. सहकारी म्‍हणून कुठलयाही कामात विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप गोगावले यांनी केला. यांना पालकमंत्री पदावरून हटवावे आणि शिवसेनेचा कुणीही पालकमंत्री द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत आम्‍ही तीनही आमदार मुख्‍यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेणार असल्‍याचे गोगावले यांनी सांगितले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील आपल्‍या सोबत असल्‍याचा दावा गोगावले यांनी केला.

आमदार गोगावले यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्‍यावर तोफ डागली. सर्व काही पालकमंत्रयांनाच कळतं अशा आवेशात त्‍या असतात. आमच्‍या मतदार संघातील कामांमध्‍ये लुडबूड करतात. पाणी योजना असेल किंवा इतर कामे असतील शिवसेनेच्‍या आमदारांना कुठंही विश्‍वासात घेतलं जात नाही. आज आमचे तीन आमदार आहेत त्‍याचे चार किंवा पाच कसे होतील याकडे आम्‍ही लक्ष केंद्रीत केलंय. पालकमंत्री अशा पदधतीने वागत असतील तर आम्‍हाला दुसरा पर्याय नसल्‍याचे गोगावले यांनी स्‍पष्‍ट केलं. यावेळी जिल्‍हाप्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, माणगावचे नवे नगराध्‍यक्ष ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, गजानन अधिकारी उपस्थित होते. नगरपंचायत निवडणकीत सेना- राष्‍ट्रवादी संघर्ष प्रामुख्‍याने समोर आला होता. त्‍यानंतर आता हा संघर्ष वाढण्‍याची शक्‍यता आहे.

Share