नवरात्रीचे पर्व आता सुरु होत आहे. संपूर्ण नऊ दिवसांच्या या सणामध्ये अनेक जण उपवास करीत असतात. शरीराची आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धी हे या उपवासांच्या मागचे उद्दिष्ट असते. वर्षभर आहारामध्ये असलेल्या असंतुलानाने आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आहारावर पूर्णतः नियंत्रण ठेऊन शरीरशुद्धी करणे हा या उपवासांच्या मागचा हेतू असतो.
नवरात्रीच्या आधी हवामान आणि ऋतू ही बदलत असतात. या काळामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तसेच पाचनक्रियाही काही अंशी शिथिल होते. याच कारणांसाठी या काळामध्ये उपवास करण्याची प्रथा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. या उपवासाच्या दिवसांमध्ये मांसाहार, प्रोसेस्ड अन्नपदार्थ, ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. हे सर्व पदार्थ पचण्यास जड असतात. उपवास करीत असल्याने ह्या पदार्थांचे सेवन आपोआपच टाळले जाते. उपवासाच्या पदार्थांमध्ये कुट्टूचे पीठ ही समाविष्ट आहे. मखाने बनविले जात असताना जे मखाने फुलत नाहीत ते दळून त्यापासून हे कुट्टू चे पीठ तयार केले जाते. कुट्टू चे पीठ उपवसामध्ये सेवन करण्यासाठी चांगले. यामध्ये शरीरास आवश्यक प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असून फायबरची मात्राही भरपूर आहे. शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्याच्या कामी कुट्टू चे पीठ अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये रीबोफ्लावीन, नियासिन ही जीवनसत्वे असून हे सर्वथा ग्लुटेन फ्री आहे.उपवास करीत असताना आपला आहार सात्विक असावा. यामध्ये फळे, दुध आणि भाज्यांचा समावेश असावा. या प्रकारच्या आहारामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाण्यास मदत मिळेल.
उपवासाच्या काळात अॅसिडीटी होऊ नये यासाठी हे करा
उपवासाच्या काळादरम्यान अॅसिडीटी होऊ नये यासाठी आपल्या भोजनाच्या वेळेमध्ये योग्य अंतर ठेवावे. एका दिवसामध्ये केवळ दोन वेळा न जेवता, तेच अन्न थोड्या थोड्या वेळाने दिवसभरात अनेकदा सेवन करावे. त्यामुळे खूप वेळ पोट रिकामे राहणार नाही, व अॅसिडीटीचा त्रासही जाणवणार नाही.उपवासादरम्यान पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. या काळामध्ये आपला आहार अगदी नियंत्रित असतो. तेव्हा शरीरामध्ये पाण्याची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. अन्यथा डीहायड्रेशन होऊ शकते. तसेच उपवासाच्या काळामध्ये तेलकट पदार्थ टाळावे. बटाटा किंवा रताळ्या सारख्या भाज्या तळून खाण्यापेक्षा ओव्हनमध्ये भाजून किंवा कुकरमध्ये उकडून घेऊन खाव्या. तसेच गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा. उपवासाच्या काळामध्ये जर बाहेर जेवायचा प्रसंग आला ‘ नवरात्री स्पेशल थाळी ‘ टाळून दही, साबुदाण्याची खिचडी, ताक अश्या पदार्थांचे सेवन करावे. बाहेर पडताना आपल्याबरोबर एखादे फळ व पिण्यासाठी पाणी जरूर ठेवावे.
नवरात्रीतील उपवास करण्यात मदत होईल अशा काही पूर्वसूचना !!कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळणे हा आरोग्याकरिता सोनेरी नियम आहे. जे काही करायचे ते मध्यम मार्गाने मग ते खेळाच्या बाबतीत असो, जेवणाच्या बाबतीत असो किंवा उपवासाच्या बाबतीत असो.
आठवड्यातील ठराविक दिवशी किंवा महिन्यातील काही ठराविक दिवसांकरिता तुम्ही उपवास करू शकता. नवरात्रीतील नऊ दिवसांच्या उपवासाचे नियोजन तुम्ही खालीलप्रमाणे करु शकता.
नवरात्री – दिवस १–३
फलाहार करावा. तुम्ही सफरचंद, केळी, चिकू, पपई, कलिंगड आणि गोड द्राक्षे यासारखी गोड फळे खाऊ शकता. आणि तुम्ही आवळ्याचा रस, दुधीभोपळ्याचा रस आणि शहाळे याचे सुद्धा सेवन करू शकता.
नवरात्री – दिवस ४-६
पुढचे तीन दिवस तुम्ही फळांचे रस, ताक आणि दुध हे दिवसभर घेऊ शकता आणि दिवसातून एकदा खाली दिल्याप्रमाणे एक वेळेस जेवू शकता.
नवरात्री – दिवस ७-९
शेवटचे तीन दिवस तुम्ही नवरात्रीचा पारंपारिक आहार घेऊ शकता. जर तुम्हाला काही आरोग्याची तक्रार आहे तर उपवास सुरु करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम राहिल आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आरामदायी असेल तेवढेच करा.
नवरात्रीचा पारंपारिक आहार
नवरात्रीचा पारंपारिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो. तोखाली दिलेल्या घटकांचा संयोग आहे.
शिंगाड्याच्या पिठाची पोळी. वरीचे तांदूळ, वरीच्या तांदळापासून बनवलेले घावन, साबुदाण्याचे पदार्थ, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा, सुरण, अरबी, उकडलेले रताळे इत्यादी.
साजूक तूप, दुध आणि ताक. हे आपल्या शरीराला शीतलता देऊ करतात.
दुधीभोपळा आणि लालभोपळा दह्यात कालवून.
भरपूर द्रव्य पदार्थ – शहाळे, रस, भाज्यांचे सूप इत्यादी. हे उर्जा तर प्रदान करतातच शिवाय शरीराचे निर्जलीकरण होऊ देत नाही आणि उपवासा दरम्यान शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात.
पपई, नाशपती आणि सफरचंद यांपासून बनविलेले फळांचे सॅलड.
जेव्हा पारंपारिक नवरात्रीचा आहार घेतल्या जातो तेव्हा खालील गोष्टी पाळणे चांगले असते
स्वयंपाकात नेहमीचे साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदेलोण वापरावे.
भाजणे, उकडणे, वाफवणे आणि विस्तवावर शेकणे यासारख्या आरोग्यकारक शिजवण्याच्या पद्धतींचा वापर करावा.
काटेकोरपणे शाकाहारी राहा.
पहिले काही दिवस धान्य टाळावे.
तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करावे.
कांदा आणि लसूण टाळा.
अति प्रमाणात अन्न ग्रहण करणे टाळा.
जे उपवास करू शकत नाहीत त्यांनी मांसाहार, मदिरा, कांदा, लसूण आणि मसाले यांच्यापासून दूर रहावे आणि स्वयंपाकात साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदेलोण वापरावे.
नवरात्री मध्ये उपवास सोडताना
जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री उपवास सोडता तेव्हा हलका आहार घ्यावा ज्याने तुमच्या शरीरावर ताण पडणार नाही. रात्रीच्या वेळी जड आणि तळलेले जेवण जेवल्याने प्रणालीला ते पचवण्यास अवघड तर होतेच शिवाय जी विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे आणि उपवासाचे जे सकारात्मक फायदे आहेत त्याकरिता अपथ्यकारक ठरते. सहज पचतील असे अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात खावेत.
उपावासामध्ये योग आणि ध्यान
शरीर ताणणे, शरीरास पीळ देणे आणि वाकणे यासारखी सोपी योगासने केल्याने उपवास करण्याच्या प्रक्रियेत मदत होते. त्यामुळे विषारी द्रव्ये बाहेर टाकणे जलदगतीने होते आणि तुम्हाला उत्साह आणि उर्जेचा संचार जाणवतो.
डाॅक्टर. ममता कोटेचा
(आहार तज्ञ)