लातूरमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात; ५ जणांचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील ५जण जागीच ठार झाले असून, बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या अपघातात अलोक तानाजी खेडकर, कोमल व्यंकट कोदरे, अमोल जीवनराव देवकते, यशोमती देशमुख आणि चालक नागेश ज्ञानेश्वर गुंडेकर यांचा मृत्यू झाला. तर प्रियांका गजानन बनसोडे गंभीर जखमी आहे.

उदगीर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीटी १३७५ मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता आगारातून चाकूरकडे रवाना झाली. दरम्यान, बस हैबतपुर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार क्रमांक एमएच २४ एबी ०४०८ बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील ५ जण जागेवरच ठार झाले. तर बसमधील १० जण जखमी झाले असून, त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.

Share