मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून अकरा महिन्यात वंदेभारत रेल्वे बाहेर पडेल

लातुर : देशात नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत रेल्वेला संपुर्ण जगभरातून मागणी होऊ लागलेली आहे. या रेल्वेसाठी लागणारे कोच लातूर येथील मराठवाडा रेल्वे प्रकल्पातून उत्पादीत होणार असून यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी शेवटच्या टप्यात आली आहे. आगामी अकरा महिन्यात या प्रकल्पातून वंदे भारत रेल्वे बाहेर पडेल अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या घोषणेनंतर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानले आहेत.

देशातील चौथ्या रेल्वे कोच प्रकल्प असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा आढावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आहे. या प्रकल्पातून लवकरच प्रत्यक्ष उत्पादन सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी जलदगतीने पुर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी रेल्वे प्रशासनास दिल्या आहेत. या कोच प्रकल्पातून देशात नव्याने सुरु झालेल्या वंदेभारत रेल्वेसाठी आवश्यक असणारे कोच तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली आहे.

या वंदेभारत रेल्वेला जगभरातून मागणी आहे. ही रेल्वे इतर देशाना देण्यासाठी भारत सरकारनेही सकारात्मकता दाखविलेली आहे. त्यामुळेच लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून वंदेभारत रेल्वेसाठी आवश्यक असणारे कोच तयार करण्यात येणार असून आगामी अकरा महिन्यात मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून वंदे भारत रेल्वे बाहेर पडेल अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

या प्रकल्पामुळे लातूरसह मराठवाड्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व यंत्रणा लवकरच उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे इतर प्रकल्पही उभारले जाऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून लातूरला ही मोठी विकासात्मक भेट मिळत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार मानले.

Share