आधी बाहुलीला फाशी दिली अन् मग स्वत: घेतला गळफास

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीने आधी खेळण्यातल्या बाहुलीला फाशी दिली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (२९ मे) दुपारी घडली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

कमल खेम साउद असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही ८ वर्षीय मुलगी कमल ही आपल्या खोलीत खेळत होती. तिचे वडील कामानिमित्त बाहेर गेले होते आणि आई घरातील कामे करण्यात व्यस्त होती. खेळता-खेळता कमलने बाहुलीच्या तोंडावर कापड गुंडाळून त्या बाहुलीला फाशी दिली. आता बाहुली आपल्याला सोडून गेली, असा विचार तिच्या मनात आला. त्या विचारात तिनेही घरामध्ये असणाऱ्या खिडकीला दोरी लावून गळफास घेतला. काही वेळाने आईने पाहिल्यानंतर मुलीने गळफास घेतल्याचे तिच्या लक्षात आले.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मुलगी हॉरर चित्रपट पहात असल्याचा संशय व्यक्त करत तिने हा प्रकार केल्याचे वाकड पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. एका सुरक्षा रक्षकाच्या मुलीने हा प्रकार केल्याचे समोर येत आहे. तिचे वडील ज्या सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्याच ठिकाणी ते कुटुंबीय मुलीसह राहत होते. अल्पवयीन मुलीने बाहुलीला फाशी देऊन नंतर स्वत: गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. वाकड पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share