कायमचा ‘अलविदा’ : प्रसिद्ध गायक ‘केके’ अनंतात विलीन

मुंबई : गेली अनेक वर्षे आपल्या जादुई आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ ‘केके’ काल गुरुवारी अखेर अनंतात विलीन झाले. गुरुवारी दुपारी २ वाजता ‘केके’ यांच्या पार्थिवावर मुंबईतील वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘केके’ यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५३ वर्षीय कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ ‘केके’ यांचे मंगळवारी (३१ मे) रोजी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकातामधील गुरुदास कॉलेजच्या नजरुल मंचावर आयोजित कॉन्सर्टदरम्यान लाइव्ह परफॉर्म करताना ‘केके’ यांना अस्वस्थ वाटू लागले. या कार्यक्रमातून ते हॉटेलमध्ये परतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

कोलकाता पोलिसांनी ‘केके’ यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याची नोंद केली आहे. मात्र, ‘केके’ यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसाची अवस्था गंभीर होती आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. बुधवारी रात्री कोलकाता येथून ‘केके’ यांचे पार्थिव विमानाने मुंबईत आणण्यात आले. त्यांचे पार्थिव गुरुवारी (२ जून) काही काळ अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. ‘केके’ यांना हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून कारकीर्द सुरू करण्याची प्रेरणा देणारे गायक हरिहरन यांच्यासह गायक सुदेश भोसले, अभिजित भट्टाचार्य, शंकर महादेवन, राहुल वैद्य, तोषी साबरी, जावेद अली, सलीम मर्चंट, गायिका अलका याज्ञिक, श्रेया घोषाल, शिल्पा राव, पॅपॉन, शंतनू मोईत्रा, फैसल मलिक, दिग्दर्शक कबीर खान आणि त्यांची पत्नी मिनी माथूर आदींसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ‘केके’ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.

https://www.instagram.com/reel/CeS2ms9KL6U/?utm_source=ig_web_copy_link

‘केके अमर रहे’ च्या घोषणा
‘केके’ यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या शववाहिनीतून वर्सोव्यातील हिंदू स्मशानभूमीत नेण्यात आले. दुपारी २ वाजता ‘केके’ यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा नकुल याने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी ‘केके’ यांची पत्नी ज्योती कृष्णा, मुलगा नकुल, मुलगी तमारा यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना शोक अनावर झाला होता. दिग्दर्शक-संगीतकार विशाल भारद्वाज, जावेद अख्तर, अशोक पंडित, हरिहरन, शंकर महादेवन, उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर आपल्या या लाडक्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या गायकाला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहत्यांचीदेखील झुंबड उडाली होती. चाहत्यांनी ‘केके’ यांना अंतिम निरोप देताना ‘केके अमर रहे’ अशा घोषणाही दिल्या. यावेळी सगळंच वातावरण भावूक झाले होते. प्रत्येकाच्या मनात ‘केके’ यांनी गायलेले ‘तडप, तडप के….’ गाणं मात्र खरी ‘तडप’ अनुभवण्यास देत होते. आपला आवडता गायक कायमचा दूर जाण्याची ही अशी तडपही यावेळी अनेकांनी अनुभवली.

हिंदी, तामिळसह ११ भाषांमध्ये गायली गाणी
२३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत जन्मलेले पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना सिनेसृष्टीत ‘केके’ या नावाने ओळखले जाते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही अनेक गाणी गायली. ‘केके’ यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे ३५०० जिंगल्स गायल्या.

‘छोड आये हम’ या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
‘केके’ यांनी प्रसिद्ध गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांच्या ‘माचिस’ या चित्रपटातील ‘छोड आये हम वो गलिया’ या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप’ या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय ‘केके’ यांनी ‘यारो’, ‘हम रहें ना रहें, याद आयेंगे ये पल’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘मैंने दिल से कहा’, ‘आवारापन बंजारापन’, ‘दस बहाने’, ‘अजब सी’, ‘खुदा जाने’ आणि ‘दिल इबादत’, ‘तू ही मेरी शब है’ सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत. संपूर्ण कारकिर्दीमध्ये ‘केके’ यांनी जवळपास २५ हजारपेक्षाही जास्त गाणी गायली.

२००० मध्ये ‘केके’ यांना ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप-तडप’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. २००८ मध्ये ‘ओम शांती ओम’मधील ‘आँखों में तेरी’ आणि २००९ मध्ये ‘बचना-ए हसीनो’ मधील ‘खुदा जाने’ या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘पल’ या म्युझिक अल्बममधून गायनाची सुरुवात
‘केके’ यांनी ‘पल’ या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०२१ मध्ये त्यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १९९९ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान ‘केके’ यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘जोश ऑफ इंडिया’ हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले.

Share