मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा जावे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच, सरकार पडू देत मग बघुन घेऊ, असा उल्लेखही या पत्रातून करण्यात आला आहे. महत्त्वाची आणि खळबळजनक बाब म्हणजे, अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे.

पत्रात म्हटले आहे की, मी विजेंद्र म्हात्रे.. जय महाराष्ट्र सायबर कॅफे, महाराष्ट्र बँक, उरणमधून बोलतोय. आत्ता लेखी लिहून पाठवतोय. सरकार पडू दे. नंतर तुला जीवे मारू. तुला जे करायचे ते कर. उद्धव ठाकरेंना सांग. आमच्या अजित पवारांच्या जिवावर मुख्यमंत्री झाला आहेस. जास्त माज करू नकोस असे उद्धव ठाकरेला सांग. संबंधित पत्रातून बलात्कार करण्याचीही धमकीही पेडणेकरांना देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करण्यात आला असून अजित पवारांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या धमकीच्या पत्रातून करण्यात आला आहे.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांना धमकीचा कॉल होता. तेव्हाही किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या 10 डिसेंबर 2021 ला त्यांना धमकीचे पत्र आले होते. या पत्रामध्ये पेडणेकर यांच्याबद्दल अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. तर कुटुंब संपवण्याचा इशारा पत्राद्वारे दिला होता. त्याशिवाय एकदा अनोळखी नंबरवरुनही किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Share