माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

नाशिक : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं आहे.  आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी फुप्फुसांचा आजार होता. नाशिकमधल्या खाजगी रुग्णाल्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

माणिकराव गावित नंदुरबारमधून  सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

माणिकराव गावित यांचा राजकीय प्रवास
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा येथे २९ ऑक्टोबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक पर्यंत झाले. १९६५ साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. धुळे जिल्हा परिषदेत नवापूर गटातून ते सदस्य म्हणून निवडून आले. १९७१ ते १९७८ साली धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती म्हणून ते निवडून आले, तर १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले.

माणिकराव गावित हे प्रथम १९८१ साली खासदार झाले, त्यावेळी त्यांचे ४७ वय होते. तेव्हापासून ते आतापर्यंत ते तब्बल ९ वेळा लोकसभेवर प्रचंड म्हणजे लाखाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत. १९९९ साली झालेल्या तेराव्या लोकसभेत त्यांना १.३०७७१ इतके प्रचंड मताधिक्य लाभले. देशातील प्रचंड मताधिक्य मिळविणाऱ्या टॉप १० खासदारांमधील एक म्हणून संबंध देशाला ते परिचित झालेत.

१९८१ ते २००९ हा माणिकराव गावित यांच्या खासदारकीचा रौप्य महोत्सवी काळ आहे. या काळात त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून काम केले. १९८१-८२ मध्ये ते समाज कल्याण समितीचे अध्यक्ष होते. १९८० ते १९८४ या काळात ते महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. १९९० ते १९९६, १९९८-९९ तसेच २००० या काळात पेट्रोलियम आणि केमिकल व नैसर्गीक वायू या मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. १९९१ ते ९३ आणि १९९९ ते २००० या काळात त्यांनी रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सल्लागार समितीवर सदस्य म्हणून कार्य केले आहे.

Share