माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. प्रकृती खालावल्यामुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्‍स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत नातू आश्रय शर्मा यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.

पंडित सुखराम शर्मा यांचा जन्म २७ जुलै १९२७ मध्ये झाला होता. १९६३ मध्ये हिमाचल प्रदेशमधून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. शर्मा यांनी १९९३ ते १९९६ या काळात केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. शर्मा हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते, तर तीन वेळा त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांचे पुत्र अनिल शर्मा हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. शर्मा यांचा नातू आयुष शर्मा हा अभिनेता असून, त्याने अभिनेता सलमान खानच्या बहिणीशी विवाह केला आहे.

भ्रष्टाचार प्रकरणामुळे वादात
भारतात मोबाईल क्रांतीचा पाया रचण्याचे काम पंडित सुखराम शर्मा यांनी केले होते. त्यांनी केलेल्या मोबाईल क्रांतीपेक्षा सुखराम हे घोटाळ्यामुळे चर्चेत राहिले होते. १९९६ मध्‍ये देशभरात गाजलेल्‍या टेलिकॉम घोटाळ्यात त्‍यांच्‍यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्‍यात आले होते. १९९६ मध्ये पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार असताना सुखराम हे केंद्रीय दूरसंचारमंत्री होते. याच काळात ते भ्रष्टाचाराच्या आरोपाने बदनाम झाले. सुखराम यांच्या दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील घरावर सीबीआयने छापा टाकला त्यावेळी सीबीआयला त्यांच्या घरातून नोटांनी भरलेले सूटकेस, बॅग आढळून आली. त्यावेळी जवळपास ४ कोटी रुपये सापडले. एवढे पैसे कुठून आले, याचे उत्तर सुखराम यांना देता आले नाही. बेकायदेशीरपणे खासगी कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांना ही रक्कम मिळाली असल्याचे म्हटले जाते. या छाप्यामागेदेखील काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचे म्हटले जाते. सीबीआयने अटक केल्यानंतर सुखराम यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. २०११ मध्ये त्यांना या प्रकरणात पाच वर्षांचा तुरुंगवासही झाला होता.

https://twitter.com/ani_digital/status/1524232617868275712?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524232617868275712%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F180840%2Fformer-union-minister-pandit-sukh-ram-passes-away%2Far

राजकीय कारकीर्द
पंडित सुखराम शर्मा यांनी हिमाचल प्रदेशमधून आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती. वर्ष १९६३ ते १९८४ या काळात ते आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि राजीव गांधी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. १९९६ मध्ये मंडीतून पुन्हा विजयी झाले आणि दूरसंचारमंत्री झाले. काँग्रेसने पक्षातून काढल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी हिमाचल विकास काँग्रेसची स्थापना केली आणि १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून सरकारमध्ये सामील झाले. सुखराम यांच्यासह त्यांचे पाच आमदार मंत्री झाले. त्यांचा मुलगा अनिल शर्मा १९९८ मध्ये राज्यसभेवर निवडून आला होता. २००३ मध्ये मंडीतून सुखराम पुन्हा विजयी झाले आणि यावेळी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. २०१७ मध्ये सुखराम यांनी आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता; परंतु दोन वर्षांत त्यांनी काँग्रेसमध्ये ‘घर वापसी’ केली. सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हा सध्या मंडीतून भाजपचा आमदार आहे.

जपानमधून भारतात आला मोबाईल फोन
भारतात मोबाईल सेवा सुरू करण्याचे काम सुखराम शर्मा यांनी केले होते. सुखराम हे दूरसंचारमंत्री असताना जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कारचालकाच्या खिशात मोबाईल फोन पाहिला होता. जपानमध्ये असे तंत्रज्ञान असू शकते मग, भारतात का नाही? असा विचार त्यांनी केला. त्यानंतर भारतात मोबाईल फोन सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.पंडित सुखराम हे १९९३ ते १९९६ या काळात दूरसंचारमंत्री होते. भारतात ३१ जुलै १९९५ रोजी पहिल्यांदा मोबाईल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. त्यानंतर भारतात टेलिकॉम क्षेत्र विस्तारत गेले.

Share