हैदराबादमध्ये आणखी चार अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

हैदराबाद : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. हैदराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच शहरात आणखी चार अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हैदराबादमध्ये एका १२ वर्षीय मुलीवर आजीच्या घरी जात असताना दोन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ३१ मे रोजी सदर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. सुलतानशाही परिसरात १ जून रोजी गस्तीवर असलेल्या पोलिसांना ती मुलगी आढळून आली होती. कॅब चालकाने तिला कोंडुर्ग येथे एका मैत्रिणीच्या घरी नेले आणि तेथे दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्या मुलीला खाली सोडले. या घटनेत शेख कलीम अली आणि मोहम्मद लुकमान अहमद यझदानी या ३६ वर्षीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

घरी नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार
दुसरी घटना एका किरकोळ दुकानात काम करणाऱ्या मुलीची आहे. ३१ मे रोजी २१ वर्षीय मोहम्मद सुफयानने पीडित मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर सत्य समोर आले. या घटनेनंतर काळा पत्थर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कारमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एका अनाथाश्रमातील आणखी एका अल्पवयीन मुलीवर २२ एप्रिल रोजी कारमध्ये बलात्कार करण्यात आला होता. ही घटना नुकतीच उघडकीस आली आहे. केक विकत घेण्याच्या बहाण्याने आणि पीडितेशी एकांतात बोलण्याच्या बहाण्याने आरोपींनी कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात अनाथाश्रमातील एका मुलीकडे फोन सापडला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता हा फोन आरोपीने दिली असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी रामगोपालपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फोटोकॉपीच्या दुकानात काम करणाऱ्या २३ वर्षीय आरोपी सुरेशला पोलिसांनी अटक केली आहे.

Share