पीएनबी घोटाळा : ईडीकडून नवे आरोपपत्र दाखल, मेहुल चोक्सीसह पत्नी प्रीतीवरही आरोप

मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा आणि मनी लाॅंड्रिंग प्रकरणातील फरार आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी आणि इतरांचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही पीएनबी घोटाळ्यातील मुख्य लाभार्थी असल्याचे ईडीने या आरोपपत्रात म्हटले आहे. पीएनबी घोटाळ्यात प्रीती चोक्सी यांनी आपले पती मेहुल चोक्सी यांनी मदत केली असल्याचा आरोप ईडीने केला आहे. मनी लाॅंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने मार्चमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रात ईडीने मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सी ही १३ हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यातील लाभार्थी असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. तसेच प्रीती चोक्सी ही २०१७ पासून फरार असून, ती २०१७ पासून अँटिग्वामध्ये आपल्या पतीसोबत लपून बसली असल्याचा दावा ईडीने केला आहे.

चोक्सी दाम्पत्याव्यतिरिक्त ईडीने त्यांच्या तीन कंपन्यांची नावे दिली आहेत. ज्यात गीतांजली जेम्स लिमिटेड, गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र ब्रँड लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच गोकुलनाथ शेट्टी, पीएनबीच्या मुंबईतील ब्रँडी हाऊस शाखेचे निवृत्त उपव्यवस्थापक नीरव मोदी या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन न्यायालयाने त्याच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता. फरार आरोपी मेहुल चोक्सी ४ जानेवारी २०१८ पासून अँटिग्वामध्ये राहत असून सीबीआय आणि ईडी, त्याच्या भारत प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहेत. फरार व्यावसायिक नीरव मोदी हा मेहुल चोक्सीचा भाचा आहे. पीएनबी बँक घोटाळ्यात नीरव मोदी हा प्रमुख आरोपी आहे.

 

ईडीकडून मेहुल चोक्सीच्या मालमत्तेवर टाच
ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे. मेहुल चोक्सीची तब्बल १२१७ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील ४१ मालमत्ता ईडीने जप्त केल्या असून, या मालमत्तामंध्ये १५ आलिशान फ्लॅट आणि १७ कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधील कार्यालय, कोलकात्यातील शाॅपिंग माॅल, अलिबागमधील फार्म हाऊस आणि २३१ एकर जमीनही जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय, ईडीने मेहुल चोक्सीचे ७२ कोटी ८० लाख रुपयांचे शेअर्सदेखील गोठवले आहेत.

Share