मुंबई : कुर्ला (पूर्व) येथील नाईकनगर परिसरातील चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात लोकांना वाचवण्यात अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कुर्ला (पूर्व) येथील एस. जी. बर्वे मार्गावरील एसटी बस डेपोच्या जवळील नाईकनगर सोसायटीची एक विंग ही चार मजली इमारत सोमवारी (२७ जून) रात्री पावणे बाराच्या सुमारास अचानक खचली आणि काही क्षणातच इमारतीचा भाग कोसळून काहीजण ढिगाऱ्याखाली दबले गेले, तर काही इमारतीच्या धोकादायक भागात अडकले. ही इमारत ४९ वर्ष जुनी असून ती धोकादायक स्थितीत होती. ही दुर्घटना घडली त्यावेळी या इमारतीत २० ते २५ रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ पथकासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकले होते. त्यापैकी १७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत अजय भोले पासपोर, अजिंक्य गायकवाड, कुशर प्रजापती, सिकंदर राजभर, अरविंद भारती, अनुप राजभर, शाम प्रजापती, अरविंद यादव यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Kurla, Mumbai | A 4-storey building collapses in Naik Nagar. Fire brigade team, police at the spot as rescue operation continues
As per BMC, 7 people rescued from under debris are in stable condition; 20 to 25 likely to be trapped under the debris. Rescue operation on pic.twitter.com/M9stC1eFh6
— ANI (@ANI) June 27, 2022
या दुर्घटनेत जखमी झालेले चैत बसपाल (वय ३६), संतोषकुमार गौड (वय २५), सुदेश गौड (वय २४), रामराज रहमानी (वय ४०), संजय माझी (वय ३५), आदित्य कुशवाह (वय १९), आबिद अन्सारी (वय २६), गोविंद भारती (वय ३२), मुकेश मोर्य (वय २५), मनिष यादव (वय २०) यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी नऊ जखमींवर उपचार करून घरी त्यांना पाठविण्यात आले. उर्वरित एकाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य एक जखमी अखिलेश माझी (वय ३६) यांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजावाडी आणि शीव रुग्णालयात दाखल जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली २० ते २५ लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य अद्याप सुरू आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 28, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
नाईकनगर सोसायटीतील चारमजली इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आली होती. मात्र, तरीही तिथे लोक राहत होते. सोमवारी रात्री जी इमारत कोसळली त्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा कुटुंबं तेथे राहत होती. हे सर्व जण भाडेकरू होते. ही इमारत कोसळल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी घटनेची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
दरम्यान, बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आ. मंगेश कुडाळकर यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपयांची मदत तर जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आ. मंगेश कुडाळकर हे सध्या बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला आहेत. आपण एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही मदत जाहीर करत असल्याचे आ.कुडाळकर यांनी गुवाहाटीतून जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.