ओबीसींना आरक्षण देणे हे जीवनातील सर्वात मोठे यश : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

बीड : ओबीसींना आरक्षण देणे हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे यश आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने नेमलेल्या ओबीसी आयोग नेमला. या आयोगाने चार महिने मेहनत घेतली. त्यामुळेच मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण देण्यात आम्हाला यश आले. आता महाराष्ट्रातही ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, असे आवाहन असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आज शुक्रवारी (३ जून) परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

गोपीनाथ मुंडेंनी आपली अर्ध्या रस्त्यात साथ सोडली
याप्रसंगी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, स्व.गोपीनाथ मुंडे आमचे मोठे बंधू होते. माझे महाराष्ट्रासोबत जवळचे नाते आहे. मला महाराष्ट्राने राजकारण शिकावले. त्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी मला राजकारण करण्यासाठी संधी दिली. मी महाराष्ट्राचा जावईदेखील आहे. यामुळे मला महाराष्ट्र आपला वाटतो. महाराष्ट्राशी माझे अतूट नाते आहे. ही भूमी तुमचा केंद्रीय मंत्री म्हणून सत्कार करणार होती; पण तुम्ही न सांगता सोडून निघून गेले. ३ जून हा दिवस मी विसरू शकत नसल्याचेही ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांनी आपली अर्ध्या रस्त्यात साथ सोडली. त्यांच्या सत्कारासाठी सर्व जनता तयार होती. मात्र, त्यांनी तो करण्याची संधीच कुणाला दिली नाही. ते इतक्या लवकर निघून जातील, असे आम्हाला वाटले नव्हते. अनेकदा वाटते की, ते पुन्हा येतील आणि आम्हाला विचारतील कसे सुरू आहे, असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. गोदीवरी नदीला पूर आलेला असताना गोपीनाथ मुंडे यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता ते स्वत: कसे दाखल झाले याची आठवण त्यांनी सांगितली.

चौहान म्हणाले की, मध्य प्रदेशात प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आम्ही मुलींचे पाय धुवून करतो. मुलगी आई-वडिलांना विसरू शकत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलीने (पंकजा मुंडे) गोपीनाथगड बनवून वडिलांचे नाव आणखीनच मोठे केले. पंकजा मुंडे आम्हाला मध्य प्रदेशात सरकार कसे चालवावे, काय करावे याचे मार्गदर्शन करत असतात, एवढे मोठे त्यांचे नेतृत्व असल्याचे म्हणत शिवराजसिंह चौहान यांनी पंकजा यांचे कौतुक केले.

महाराष्ट्र सरकारने शिवराज सिंह चौहान यांचे अनुकरण करावे : पंकजा मुंडे

यावेळी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने ज्या पद्धतीने ओबीसींना आरक्षण दिले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही ओबीसींना आरक्षण द्यावे. शिवराजसिंह चौहान यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी केलेले काम बघून महाराष्ट्र सरकारला बुद्धी आणि प्रेरणा लाभो, त्यांनी आमच्या शिवराजसिंह चौहान यांचे अनुकरण करून महाराष्ट्रातील समस्त ओबीसींवर आलेल्या संकटातून बाहेर काढावे आणि ओबीसींना पुनश्च राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. ओबीसींचे मोर्चे, ओबीसींचे मेळावे घेणे आणि ओबीसींचा मी नेता आहे हे म्हणणे यासाठी आम्हाला ओबीसींचे आरक्षण नकोय, तर ओबीसींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरक्षण सुरक्षित पाहिजे, असे पंकजा मुंडे राज्य सरकारला उद्देशून म्हणाल्या.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कामांचे कौतुक करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, आपण मध्य प्रदेशात जे करून दाखवले ते देशात कुणालाही जमले नाही. तुम्ही ओबीसींचे आरक्षण सुरक्षित करण्याचे काम केले. त्यामुळे आम्ही आपला सन्मान करतो. ज्यांनी ‘लाडली लक्ष्मी’ बनवली, त्यापासून प्रेरणा घेऊन मी महाराष्ट्रात ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली. आपल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेपासून प्रभावित होऊन महाराष्ट्रात ग्रामसडक योजना सुरू केली. गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाहीत; पण आपल्यासारखे नेते जेव्हा आमच्यासोबत, आमच्या कुटुंबासोबत जोडले जातात तेव्हा आजही मला माझ्या वडिलांचा आभास होतो. गोपीनाथ मुंडे आज आमच्यासोबत नाहीत. एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे गोपीनाथ मुंडे आमच्यातून निघून गेले. मात्र, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत आहेत. ऊसतोड मजुराचा मुलगा देशाच्या केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचतो ही अभिमानास्पद बाब असल्याचे पंकजा यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीतील माझ्या पराभवाने मला देशपातळीवरील राजकारणात मोठे पद दिले. माझा पराभव मला समाजसेवेसाठी फायदेशीर ठरला, असे पंकजा म्हणाल्या.

Share