कृषी विज्ञान केंद्राच्या प्रांगणात मंगळवारी एकदिवसीय धान्य महोत्सवाच आयोजन करण्यात आल होत. हा महोत्सव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषत: देशी गहू, काळा गहू, ज्वारी, बाजरी, डाळी या शेतमालाची खरेदी ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून करता आली
या महोत्सवाचे उद्घाटन माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांनी कृषी मालाचे स्टॉल लावले होते. आत्माचे उपसंचालक अनिल सोळुंके, आरसीएफचे उपप्रबंधक जाकीर शेख, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुरेश पटवेकर, जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण जाधव, एनएआरपीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष बागडे, फळ संशोधनचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील, सुरेशसिंग बेडवाल, केव्हीकेचे समन्वयक डॉ. किशोर झाडे आदींची उपस्थिती होती.
धान्य महोत्सवात काळे गहू व सेंद्रिय गुळाला सर्वाधिक ९० ते १०० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. तर बन्सी देशी गहू ४० ते ५० रुपये, मूग व उडीद डाळ ११० रुपये, हरभरा ९० रुपये, ज्वारी ३० ते ४०, बाजरी ३० दराने विक्री झाले. हळद, सांडई, कुरडई, पापड, हळद, हर्बल उत्पादने खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.