राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

मुंबई : महाराष्ट्रात राजकरण ढवळून निघालं असताना आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कोश्यारी यांना मुंबईतील गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार संकटात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना तब्बल ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं राज्यातील सत्तानाट्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान ,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. राज्यपालांना आज सकाळी ९.१५  वाजण्याच्या सुमारास गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. मंगळवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना आज सकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Share