आमदारांचे बहुमत असेल तरच गटनेत्याची हकालपट्टी करता येते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी, अशाप्रकारे गटनेत्याला बडतर्फ केले जाऊ शकत नाही, असे म्हटले आहे.

काल सोमवारी (२० जून) झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली. विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जवळपास वीसेक आमदार भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये सुरतला गेले. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे शिवसेनेसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.
एकनाथ शिंदे यांनी २० पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरात गाठल्याने ते भाजपला पोषक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजप नेतेही शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने महाविकास आघाडी सरकार कोसळणार का? भाजप काय भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस सत्ता स्थापन करू शकतात का? महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात काय घडू शकते? अशा चर्चेला उधाण आले आहे.

एकनाथ शिंदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. आज मंगळवारी मुंबईत तातडीने झालेल्या शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी गटनेता पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा निर्णय घेतला. आता शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी एकनाथ शिदेंऐवजी शिवसेनेचे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अजय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे, त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे गटनेत्याला बडतर्फ केले जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्यांनी म्हटले आहे की, “मला जो काही नियम माहीत आहे, त्यानुसार गटनेत्याची अशा प्रकारे हकालपट्टी करता येत नाही. गटनेत्याची हकालपट्टी करायची असेल, तर तुमच्याकडे आमदारांचे बहुमत असावे लागते. आमदारांची संख्या लागते. जिथे आमदारांची संख्याच नाही, तिथे गटनेत्याची हकालपट्टी करायची, हे कायद्यात बसत नाही,” असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

“उद्या एखाद्या पदाधिकाऱ्याने उठायचे आणि मी पक्ष प्रमुखांची हकालपट्टी केली, असे सांगायचे, हे योग्य नाही. अशी कायद्यामध्ये मान्यता नाही. कायद्यानुसार तुम्हाला बहुसंख्य लोकांची मान्यता घेऊनच गटनेत्याची हकालपट्टी करता येते,” असेही ते म्हणाले.

Share