राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी – शिवसेना

कोल्हापुर : राज्यपाल भगससिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय? असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होते.  यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना नको त्या विषयात नाक खुपसू नये. राज्यपालांचे छत्रपतींविषयीचे खरे विचार काल आपसूक बाहेर आले. त्यांच वय आणि वक्तव्य बघता त्यांना निवृत्तीची गरज असून, केंद्र शासनाने तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राज्यातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेना आ. राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

राज्याचे राज्यपाल यांनी नविन जावईशोध लावला. पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपशब्द काढाल तर शिवसेना शांत बसणार नाही. छत्रपती अवमान महाराष्ट्रात कदापि खपवून घेतला जाणार नाही. राज्यपाल कोशारी यांनी भाजपचे लांगूलचालन सोडून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदास न्याय मिळेल असे काम करणे अपेक्षित आहे. परंतु, वयानुसार त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, केंद्र शासनाने अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीची महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी शिवसैनिकांनी केली.

काय म्हणाले राज्यपाल?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं’ असं राज्यपाल म्हणाले. तसंच, ‘शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे’ असंही राज्यपाल म्हणाले.

Share