राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा – अजित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यांने पुनर्विचार करण्याची वेळी आली आहे,असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट मध्ये म्हटले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील असेही पवार यांनी म्हटले.  तसेच राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांचीपंतप्रधान महोदयांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

राज्यपाल कोश्यारी काय म्हटले होते?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांना जुन्या युगाचे नायक म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांना माघारी पाठवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यांनी या मुद्यावरून भाजपवरही टीका केली.

Share