२६ मे रोजी देशभर गुंजणार हनुमान चालिसा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात एकीकडे हनुमान चालिसा पठणावरून राजकीय वातावरण पेटले असताना आता, मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या २६ मे रोजी देशभर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने देशभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर, मंदिरांमध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमाना चालिसा पठणही केले जाणार आहे.

२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि देशाची सत्ता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडे गेली. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरापूर्वीच भाजपकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या दिवशी म्हणजेच २६ मे रोजी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये पूजा, यज्ञ आणि हनुमान चालिसाचे पठण केले जाणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी संमेलन, युवा संमेलन आणि मागासवर्गीयांसाठी संमेलन आयोजित केले जाणार आहे. मोदी सरकारच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त राजधानी दिल्लीसह देशभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांना अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी संध्याकाळी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजप सरकारने देशात उज्ज्वला, जन धन, हर घर नल अशा अनेक योजना सुरू केल्या. सरकार आपल्या सर्व योजनांच्या मदतीने देशाला नवीन भारताच्या निर्मितीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकार अमृत महोत्सवही साजरा करत आहे.

Share