मुंबई- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेनेने देखील उमेदवार उभे केले असून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी गोरखपूरमधल्या काही मतदारसंघांमध्ये गुरुवारी प्रचारसभा घेतल्या. उत्तर प्रदेशातल्या हिंदी भाषिक मतदारांसमोर शिवसेना उमेदवार मतांसाठी प्रचार करत असल्यामुळे त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून मनसेनं या प्रचारासंदर्भात एक खोचक ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
अर्धी मुंबई हिंदी बोलते असा जावई शोध लावण्याऱ्याना "भैय्या भूषण"पुरस्कार द्यायला पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 25, 2022
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या डुंबारियागंजमध्ये प्रचारसभा घेताना केलेल्या भाषणात मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांचा उल्लेख केला होता. याचसंदर्भात आता मनसेनं टोला लगावला आहे.यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर संजय राऊतांचं नाव न घेता टोला लगावला आहे. “अर्धी मुंबई हिंदी बोलते असा जावई शोध लावण्याऱ्यांना ‘भैय्या भूषण’ पुरस्कार द्यायला पाहिजे”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.