मुंबई : मोठ्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असून, भारतीय हवामान विभागाने आज भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली व नागपूर या पाच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाने सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ ते ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD ने उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे (डीप डिप्रेशन) विदर्भात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (ता.२०) पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे. पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मान्सूनची आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोकहिमालय पर्वताच्या पायथ्याकडे सरकले आहे. पूर्वेकडील टोक आज (ता.२०) दक्षिणेकडे येण्याचे संकेत आहेत. पाकिस्तान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
IMD GFS मोडेल नुसार, कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3,4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढचे 2 दिवस. pic.twitter.com/Bh1tanYSsd
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 20, 2022
दरम्यान घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. कोकणासह घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळी प्रणालीत रूपांतर झाले आहे.