एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

वर्धा : वर्ध्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या हवालदिल शेतकऱ्यांचे दु:ख त्यांच्या बांधावर जावून समजावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असा एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सेलू तालुक्यातील लोंढापूर, कोल्ही व वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे नुकसानीची कृषिमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.विद्या मानकर, तहसिलदार महेंद्र सुर्यवंशी, उपविभागीय कृषि अधिकारी अजय राऊत यांच्यासह महसूल, कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले आहे.शासन दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीला मदत देते. परंतु मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पंचनामे करून लवकरात लवकर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. पंचनामे करतांना ते बोगस होणार नाही आणि सत्य पंचनामे लपविले जाणार नाही, अशा सुचना केल्या आहे. त्याप्रमाणे अधिकारी पंचनामे करत असल्याचे पुढे बोलतांना कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले.

जिल्ह्यात आगमण झाल्यानंतर सेलु तालुक्यातील लोंढापुर शिवारात नाल्याच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. लगतच्या कोल्ही-घोराड पांदनीचे झालेले नुकसान देखील पाहिले. येथे शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी आपले दु:ख यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या त्या देखील त्यांनी समजून घेतल्या.

वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे भदाडी नदीच्या पुरामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यानुकसानीची देखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी सुध्दा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे व दु:ख त्यांनी जाणून घेतले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.मानकर यांनी जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती यावेळी मंत्रीमहोदयांना अवगत केली. तीन विभागातील सात जिल्ह्याची नुकसानीची पाहणी करणार असून त्यानंतर शासनास अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Share