बिहार, आसाममध्ये पावसाचा धुमाकूळ; ३३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आली असताना दुसरीकडे काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे, तर बिहार, आसाम, कर्नाटक आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. बिहारमध्ये शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून, २९ जिल्ह्यांतील सुमारे ७.१२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. कर्नाटकातही मुसळधार पावसामुळे काही भागात पूर आला आहे.

बिहारमध्ये शुक्रवारी वादळी वारे, मेघगर्जनेसह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून वीज पडल्याने तसेच वादळी पावसाच्या तडाख्याने १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील भागलपूर परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या ठिकाणी वीज पडून सात जणांचा तर मुजफ्फरपूरमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने ही मदत मिळावी यासाठी वेगाने पंचनामे करून ही मदत लवकरात लवकर पोहचवली जावी यासंदर्भात निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील वादळी पावसामुळे आणि वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करताना बिहारमधील या घटनांमुळे फार दु:ख झाल्याचे म्हटले आहे. देव मृतांच्या नातेवाईकांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थनाही मोदींनी केली आहे.

दरम्यान, आसाम आणि शेजारील राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपण विस्कळीत झाले असून, नागाव जिल्ह्यात ३.३६ लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. कछार जिल्ह्यात १.६६ लाख, होजईमध्ये १.११  लाख आणि दारंग जिल्ह्यात ५२ हजाराहून अधिक लोक पावसामुळे प्रभावित झाले आहेत, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. दिमा हसाव जिल्ह्यातदेखील पुरामुळे हाहाकार उडाला असून, ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने लोकांना जगणे अशक्य झाले आहे. केरळमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडाली आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. वेगवेगळ्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारने खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफची चार पथके तैनात केली आहेत.

पावसामुळे राज्यभरात २३ घरांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे राज्यातील २०४ हेक्टर परिसरातील शेतीचे तर ४३१ हेक्टर परिसरातील बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांनी चिकमंगळुर, दक्षिण कन्नड, उडपी, शिवमोग्गो, दावणगेरे, हसन आणि उत्तर कन्नड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांनी बेंगळुरूतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

Share