‘प्रवीण मसाले’ चे निर्माते हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

पुणे : आपल्या ताटातील अन्नाला चव देण्याचं काम करणाऱ्या प्रसिद्ध अशा ‘प्रवीण मसाल्या’चे निर्माते तथा पुण्यातील ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. प्रवीण मसाले या मसाल्याच्या कंपनीची स्थापना त्यांनी १९६२ मध्ये केली होती.

मारवाडी कुटुंबातून आलेल्या चोरडिया यांनी महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या चवीने वेगवेगळे मसाले पुरवले आहेत. चोरडिया हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील.  हुकमीचंद चोरडिया यांच्या पत्नी कमलाबाई यांनी मसाले बनवून विकण्याची कल्पना पुढं आणली. यातून मोठ्या उद्योगाची स्थापना झाली.  वेगवेगळ्या प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात. याला खास महाराष्ट्रीयन तडका असतो. शाकाहारी, मांसाहारी जेवणासाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे मसाले प्रवीण मसालेवाले समूहाकडून बनवले जातात.

प्रवीण मसाले हा ब्रँड घरोघरी पोहोचवण्यासाठी हुकमीचंद चोरडियांनी ४०-५० वर्ष अविरत कष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनानं उद्योग जगतात शोकाचं वातावरण आहे.

 

Share