हिंदूंना सरकारने बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण द्यावे

मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. बिगरकाश्मिरी लोकांना टार्गेट करून दहशतवाद्यांकडून त्यांची हत्या केली जात आहे. या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रात मनसे या हल्ल्यानंतर आक्रमक झाली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारने हिंदूंना स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यायला हवेत, अशी मागणी केली आहे.

गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आठ नागरिकांची हत्या केली असून, त्यापैकी तीन जण बिगरमुस्लिम सरकारी कर्मचारी होते. कुलगाममध्ये गुरुवारी (2 जून) दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. विजयकुमार असे या बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. ते कुलगाममधील इल्लाकी देहाती बँकचे आरेह मोहनपुरा शाखेचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. विजयकुमार हे मूळचे राजस्थानचे असून, एका आठवड्यापूर्वीच ते येथे सेवेत रुजू झाले होते. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. एका दहशतवाद्याने बँकेत घुसून विजयकुमार यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, दोन दिवसांपूर्वीच कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी रजनी बाला या शिक्षिकेची हत्या केली होती. त्याआधी १२ मे रोजी बडगाम जिल्ह्यात छदुरा तहसील कार्यालयात राहुल भट या लिपिकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. टार्गेट किलिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मे महिन्यात ४० नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. काश्मीरमधील सुरक्षेची स्थिती गंभीर असल्याचे नमूद करत काश्मीरमधील नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.मनसेनेही काश्मीरमधील वाढत्या हत्यासत्राबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, “ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच बंदुका आणि ते चालवण्याचे प्रशिक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे”, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज शुक्रवारी नवी दिल्लीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात घडलेल्या दहशतवादी घटना, विशेषतः लक्ष्य हत्या आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Share