कानपूरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; बाजारपेठा बंद

कानपूर : भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा राडा झाला. बाजार बंद करण्याच्या घोषणेमुळे दोन समुदायांत तुफान दगडफेक झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, दोन गटात झालेला संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. सध्या कानपूरमधील स्थिती तणावपूर्ण आहे.

विशेष म्हणजे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान अशा प्रकारचा हिंसाचार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीमार केल्यानंतर यतीमखानाजवळील बेकनगंज भागात दोन गटांत हिंसाचाराला तोंड फुटले. त्यानंतर दोन्ही समाजातील गटाकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली.

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २७ मे रोजी एका टीव्ही डिबेटध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे मुस्लिम समुदायात नाराजी पसरली आहे. शर्मा यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी जोहर फॅन्स असोसिएशन आणि इतर मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी कानपूरमधील मुस्लिम समाजाला व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार चमनगंज, बेगनगंज, तलाक महल, कर्नलगंज, हिरामण पूर्वा, दलेल पूर्वा, मेस्टन रोड, बाबू पूर्वा, रावतपूर आणि जाजमाऊ या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, दुपारच्या नमाज पठणानंतर ३ च्या सुमारास अचानक मोठा जमाव एकत्र आला आणि त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली.

नमाजानंतर दुपारी यतिमखाना येथील सदभावना चौकीजवळ दोन्ही समाजातील जमाव एकत्र आला. त्यावेळी पोलिसांनी लाठीमार करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात अनेकजण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अनेक राऊंड गोळीबार केला. लाठीमारही केला. त्यानंतरही जमाव दगडफेक करत होता. बजरंग दलाचे नेते प्रकाश शर्मा व विहिंपच्या नेत्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना काही अंतरावरच रोखून धरले.

दरम्यान, पोलिस आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गोंधळ करणाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी आरएएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या हिंसाचारानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Share