मुंबई : मला उद्याच्या विधान परिषद निवडणुकीची अजिबात चिंता नाही. जर मी चिंता करत बसलो तर जे शिवसेनाप्रमुखांनी माझ्या धमण्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार-जीत होत राहाते, उद्या आम्ही जिंकणारच आहोत. राज्यसभा निवडणुकीत आमचे एकही मत फुटलेले नाही, कोणी काय काय कलाकारी केली ते मला माहिती आहे. त्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता वाटत नाही. आता शिवसेनेत गद्दार मनाचा कोण राहिलेला नाही. आईचे दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको, असे सांगत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी करणाऱ्यांना सूचक इशारा दिला.
शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज रविवारी (१९ जून) मुंबईतील हॉटेल ‘वेस्ट इन’ मध्ये साजरा करण्यात आला. उद्या सोमवारी (२० जून) होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील ‘वेस्ट इन’ हॉटेलमध्ये ठेवले आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला.
मला आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको!
उद्धव ठाकरे म्हणाले, जा सगळे भाजपमध्ये आणि सत्तेचा माज घेऊन जा, किती दिवस चालेल? प्रत्येकाला पर्याय असतो; पण शेराला सव्वाशेर असतोच, हे लक्षात ठेवावे. आताचे राजकारण हे पावशेरचे चालले आहे. महाराष्ट्रात सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवून द्या, महाराष्ट्र पेटला तर एखाद्याला खाक केल्याशिवाय राहत नाही हे लक्षात असू द्या. आपण फाटाफुटीचे राजकारण भोगत आलो आहोत; पण कितीही फाटले तरी शिवसेना अजून मजबुतीने उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवले आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, मला आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाचे आमदार हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. आपली मतं फुटू नयेत यासाठी सर्वपक्षांनी ही काळजी घेतली आहे. या सर्व प्रकारावर भाष्य करताना, आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही आहे, अशी कोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, आज आमदारांना या हॉटेलमध्ये आपण एकत्र ठेवले आहे. त्यांची बडदास्त ठेवली आहे. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही आहे. आपल्याच आमदारांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही असेल; पण उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते चांगल्या पद्धतीने दिसले पाहिजे. राज्यसभेत शिवसेनेचा एकही आमदार फुटलेला नाही; पण कोण गद्दार आहे हे आम्हाला कळलेले आहे.
ते म्हणाले, ह्रदयात राम आणि हाताला काम असे चित्र सध्या दिसते. हाताला काम नसेल तर नुसते ‘राम- राम’ म्हणून काही होणार नाही. शिवसेनेने दिलेले वचन पाळले म्हणून आजही शिवसेना टिकून आहे. हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी बुलंद केला. शिवसेनेचा जन्म भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी झाला होता. नुसत्या उद्धव ठाकरेला किंमत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस आदराने उभा राहतो, हा सन्मान कुणी काढून घेऊ शकत नाही, तो मान मला बाळासाहेबांनी दिला आहे. मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही. ज्याच्याकडे धाडस नसते त्याच्याकडे काहीच नसते. शिवसेनेच्या स्थापनेवेळी जो नारळ फोडला गेला त्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले, ही जबाबदारी किती मोठी असू शकते हे मला तेव्हा माहीत नव्हते. शिवसेना प्रमुखांनंतर नेतृत्त्व कोण करणार यांना आपण जोरदार उत्तर देतोय.
‘अग्निपथ’ योजनेवरून केंद्र सरकारला टोला
‘अग्निपथ’ योजनेवरून टीका करताना, आज सैनिकांना चार वर्षांसाठी भाडेतत्वावर घेत आहात. उद्या चालून भाडोत्री सरकारही आणणार का, मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे टेंडर काढणार का? नाहीतरी दर पाच वर्षांनी नागरिकांना मते मागाला जावेच लागते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन सरकारने पाळले नाही. आता ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा करून युवकांच्या भावनांशी खेळले जात आहे. फक्त नावच मोठे दिले आहे. काम मात्र सुतार काम व वाहन चालकाचे करावे लागणार आहे. कोणत्या योजनेला कोणते नाव देताहेत याचाही विचार केंद्र सरकार करीत नाही. जी वचने पाळता येतील अशी वचने जनतेला द्या. अग्निवीरांच्या नावाखाली तुम्ही तरूणांच्या आयुष्याशी खेळत आहात, असेही ते म्हणाले.
१७ ते २१ या उमेदीचा वयात तरुणांना कंत्राटी काम देण्याची योजना सरकारने आखली आहे. उमेदीच्या वयाच त्यांच्याशी खेळले जात आहे. चार वर्षांनी १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. १० टक्के आरक्षणाने काय होणार आहे? उमेदीच्या वयात देशातील तरुणांना मोठे स्वप्न दाखवायचे. त्यांना त्याच्या मागे धावायला लावायचे. चार वर्षांनंतर त्यांचे काय? उर्वरित तरुणांनी उमेदीचा काळ सेनेला दिल्यानंतर त्यांनी काय करावे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले.
तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है -संजय राऊत
या कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर आणि राज्यातील भाजपवर निशाणा साधला. तुम्ही एक जागा जिंकली तर जग जिंकले असे होत नाही. ‘तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है’, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप होते. आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून झाली आहे. त्यामुळे हिंदुत्वावर शिवसेनेला कुणाचेही मार्गदर्शन नको आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची ठिणगी पेटवली मुंबईतील या ठिणगीचा देशभर वनवा झाला. त्यामुळे हिंदुत्वाचे धडे सेनेला शिकवण्याची गरज नाही. ‘अब तक ५६’ पुढेही सुरूच राहणार आहे. विरोधकांना घमेंड आली आहे. राज्याची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अग्निपथ’ योजना हा केंद्र सरकारचा मूर्खपणा आहे. मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशात अराजक निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शांत यासाठी आहे. कारण राज्याची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आहेत तोपर्यंत महाराष्ट्र शांत आहे. कोणत्याही केंद्रीय संस्थाना आम्ही घाबरत नाही. सीबीआय, ईडी यांची भीती दाखवू नका. अंगावर आलात तर शिंगावर घेतले जाणार नाही तर तुडवले जाल, असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला.