‘लाल बत्ती’ मध्ये झळकणार नाना पाटेकर; साकारणार दमदार भूमिका

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणारे अभिनेते नाना पाटेकर आता रुपेरी पडद्यावर पुन्हा दिसणार आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘लाल बत्ती’ या वेब सीरिजमधून नाना पाटेकर कमबॅक करत आहेत. ‘लाल बत्ती’ या वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर हे एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहेत.

केवळ अभिनय आणि दमदार संवादफेकीच्या जोरावर नाना पाटेकर यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्थापित बॉलिवूड कलाकारांच्या तुलनेत सौंदर्याच्या, देखणेपणाच्या व्याख्येत न बसणारे नाना पाटेकर हे कायमच त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही तुफान आहे. नानांचा चित्रपट आवर्जून पाहणारा खास प्रेक्षकवर्ग आहे. नाना पाटेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून एकाही चित्रपट दिसले नव्हते. ते कोणत्या कलाकृतीत झळकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना नाना एका हिंदी चित्रपटात काम करत असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच ‘द कन्फेशन’ नावाच्या एका सामाजिक थरार असलेल्या चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाना पाटेकर हे प्रकाश झा यांच्या ‘लाल बत्ती’ या सामाजिक-राजकीय वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे स्वतः नानांनी ही माहिती दिली आहे.

प्रकाश झा यांच्या आगामी ‘लाल बत्ती’ वेब सीरिजच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर हे वेबविश्वात पदार्पण करत आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. नाना पाटेकर यांनी याआधी प्रकाश झा यांच्या ‘अपहरण’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटांत काम केले आहे. यानंतर प्रकाश झा यांच्यासोबत ते आगामी ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये ते पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रकाश झा यांच्या ‘राजनीती’ या चित्रपटात नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय रणबीर कपूर, अजय देवगण, नसीरुद्दीन शाह, मनोज बाजपेयी आणि कतरिना कैफ असे दिग्गज कलाकारही या सिनेमात होते. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी प्रकाश झा आणि नाना पाटेकर हे दोघे ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. नाना पाटेकर यांनी स्वतः या प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, ”हो, मी तो प्रोजेक्ट करत आहे. ‘लाल बत्ती’ ही अशीच एक वेब सीरिज आहे, जी राजकारणाची काही काळी सत्य उघड करेल.

‘लाल बत्ती’ या वेब सीरिजमध्ये नाना पाटेकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. नाना हे बॉलिवूडचे एक दमदार अभिनेते आहेत आणि त्यांच्या पुनरागमनाची बातमी त्यांच्या चाहत्यांना नक्कीच सुखावणारी आहे.

Share