राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो – शरद पवार

मुंबई : राज्यात एवढी मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, याचा मला अभिमान वाटतो. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शरद पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

शरद पवार म्हणाले की, सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगले काम केल्याचे ठिकठिकाणी ऐकायला मिळते. प्रदेशाध्यक्षांनी देखील सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे. असं शरद पवार या बैठकीत म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना कुणाची, शिवसैनिक कुणाच्या बाजूने असेही प्रश्न चर्चिले जात आहेत. शिवसेनेतील बंडखोरीच्या मुद्द्यावरही शरद पवारांनी या बैठकीत भाष्य केलं. ‘मी दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असताना अनेक शिवसैनिक मला भेटायला येत होते. सत्तेत नसलेला आणि नेहमी फिल्डवर असलेला शिवसैनिक हा कुठेही गेलेला दिसत नाही. ज्यांनी सत्ताबदल करण्याची पावले टाकली, त्या लोकांच्या बाबतीत शिवसैनिक वेगळ्या मनस्थितीत आहेत,’ असं पवार म्हणाले.

Share