दौपदी मुर्मू यांना पाठिंब्याबाबत सेनेची भूमिका अनाकलनीय – बाळासाहेब थोरात

मुंबई : शिवसेना पक्षफूटीनंतर शिवसेनेचे काही खासदार देखील पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त येत होते. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत, एनडीएच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे विनंती पत्र शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले. त्यावर बैठक घेत शिवसेनेने आपला अधिकृत निकाल कळवला. शिवसेना आता दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेवर आता काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केेले. शिवसेना महाविकास आघाडीत असून येवढा मोठा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विचारले देखील नाही. त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी ट्विट करत दिली आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असं थोरात म्हणाले.

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

Share