‘मी, बाळासाहेब थोरात, वळसे पाटील मराठ्यांच्या पोटचे नाहीत का?’- अजित पवार

रायगडः  मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत. त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या तरुणांना खडसावले. शिवनेरी गडावर आयोजित करण्यात आलेल्या शासकीय शिवजयंतीच्या कार्यक्रमातील सभेत अजित पवार बोलत होते.

शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी प्रेक्षकांमधील एका व्यक्तीकडून मराठा आरक्षणासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी त्या व्यक्तीला खाली बसायला सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा अजित पवार यांच्या भाषणात अडथळा आणला. त्यानंतर अजित पवार चिडले. तु कोणाची सुपारी घेऊन आलाय का असे त्या व्यक्तीला अजित पवारांनी खडसावले. आज शिवजयंती आहे. असे चालणार नाही. असे अजित पवार म्हणाले.

मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आम्ही काही मराठ्यांच्या पोटचे नाहीत का? आम्हाला आमच्या जातीचा अभिमान नाही का ? पण शिवाजी महाराजांनी काय शिकवलंय? सर्वांना सोबत घेऊन जायलाच शिकवलंय ना ? इतर कुठल्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सामाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच आमची भुमिका आहे. मात्र, प्रश्न न्यायालयात अडकला आहे. नियमात बदल करून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारकडून नियमातच बदल करावा लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

इतर समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा आम्ही नियम केला. सर्व आमदारांनी तसा ठराव केला. २८८ आमदारांनी ठराव केला. पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कायदा आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे. काही राज्यात वेगवेगळं आरक्षण मागितले जाते. बाळसााहेब थोरात, सीताराम कुंटे, मुख्यमंत्री आणि मी असे चारपाचजण पंतप्रधानांना भेटलो. आम्ही पंतप्रधानांकडे १२ मागण्या केल्या. त्यातील मराठा आरक्षणाची पहिली मागणी होती. पंतप्रधानांनी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते, असे अजित पवार यांनी सांगितले.

Share