वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करणार, पंतप्रधान मोदी

ठाणेः आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  काल ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मध्य रेल्वेमार्गावर ३६ नवीन लोकल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देऊन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गिकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका असतील. या दोन्ही मार्गिकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आज पासून ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

अनेक आव्हानांचा सामना करत ठाणे – दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याचे समाधान आहे. या मार्गिकांवर डझनभर पूल बांधण्यात आले असून फ्लायओव्हर आणि बोगद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याकामासाठी कामगार, अभियंते यांनी दिवसरात्र मेहनत करुन राष्ट्रनिर्माणाच्या कामात भरीव योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.

आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करणार

मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे ४०० कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतुकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

Share