तुला पण संपवतो… मनसेच्या पुणे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

पुणे : मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोरच हा सर्व प्रकार घडला आहे. समीर थिगळे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. ही घटना राजगुरुनगर येथील त्यांच्या राहत्या घरासमोर घडली. समीर थिगळे हे त्यांच्या घरासमोर उभे असताना दोन जण आले त्यातील एकाने समीर थिगळे यांच्यावर बंदूक रोखून “मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय. तुलाही माज आलाय संपवतोच तुला” असे म्हणत पैशांची मागणी केली. यावेळी आरोपीकडून फायरिंग देखील करण्यात आली. या फायरिंगमध्ये थिगळे थोड्यक्यात बचावले आहेत. विशेष म्हणजे पुन्हा एकदा आरोपीकडून हवेत गोळीबार करत धमकी देण्यात आली.

दरम्यान या प्रकरणात आरोपी  मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राजगुरू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे धमकी देणारे आरोपी हे हत्या प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत.

कोण आहे समीर थिगळे?

समीर थिगळे हे मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. गेल्यावर्षीच एप्रिलमध्ये त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. त्यांच्यावर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची जबाबदारी आहे.

Share