मी माझा जीव देईन; पण पश्चिम बंगालचे विभाजन होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मी माझा जीव देईन; पण भाजपला पश्चिम बंगालचे विभाजन होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालपासून वेगळ्या राज्याची मागणी केली आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही मला धमकावू शकता, माझ्या छातीवर बंदूक ठेवू शकता आणि तरीही मी अखंड बंगालसाठी लढत राहीन, असे ममता यांनी स्पष्ट केले आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात अलिप्ततावाद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप करून ममता बॅनर्जी म्हणाल्या, उत्तर बंगालमधील सर्व समुदायांचे लोक अनेक दशकांपासून एकत्र राहत आहेत; परंतु भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप कधी गोरखालँडची मागणी करत आहे, तर कधी वेगळ्या उत्तर बंगालची मागणी करत आहे. गरज पडल्यास मी माझे रक्त सांडायला तयार आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत राज्याचे विभाजन कधीच होऊ देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Share