दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरी ईडीचे छापे; सापडले कोट्यवधींचे घबाड

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केलेली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (६ जून) सत्येंद्र जैन आणि त्यांच्या निकटवर्तींयांच्या घरी छापे टाकले. या छाप्यात ईडीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तींयांकडून ईडीने २.८५ कोटी रुपयांची रक्कम आणि १.८० किलोची सोन्याची १३३ नाणी जप्त केली आहेत. त्यामुळे सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीच्या पथकाने सोमवारी नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. ईडीकडून हवाला ऑपरेटर्सच्या ठिकाणांवरदेखील छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईत ईडीला सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तीयांच्या घरी कोट्यवधींची रोख रक्कम आणि सोन्याची नाणी आढळली आहेत. सत्येंद्र जैन यांच्या निकटवर्तीयाच्या घरातून जवळपास तीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामध्ये प्रकाश ज्वेलर्सवर टाकेलेल्या छाप्यात २ कोटी २३ लाख तर वैभव जैन नामक व्यक्तीकडे ४१ लाख ५ हजार रोख मिळाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वैभव जैन यांच्याकडेच १३३ सोन्याची नाणी सापडली आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ४ ऑगस्ट २०१७ रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात हवालाद्वारे ४.८१ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जैन यांना ३० मे रोजी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना ९ जूनपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये ईडीने जैन आणि त्यांच्या कुटुंबाची सुमारे ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन यांच्या जवळच्या लोकांचे काही कंपन्यांशी संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचीदेखील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे.

सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने ४.८१ कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला आहे. सत्येंद्र जैन यांनी २०१५-१६ दरम्यान मनी लाँड्रिंग केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. जैन यांनी कोलकातामधील बेनामी कंपन्यांमध्ये हवाला गुंतवणूक केल्याच्या आरोपाखाली ईडीने त्यांच्या अटकेची कारवाई केली आहे. सत्येंद्र जैन हे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जातात. सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्याविरोधात यापूर्वी कारवाई केलेली आहे.

सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण ताकद लावून आम आदमी पार्टीच्या मागे लागले आहेत. नवी दिल्ली आणि पंजाब सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, असे केजरीवाल म्हणाले.

Share