वेळ आली तर मीही निवडणूक लढवेन – अमित ठाकरे

औरंगाबाद : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सुचक विधान केलं आहे. पक्षाला गरज वाटली तर भविष्यात मी निवडणूक लढवू शकतो, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं.

अमित ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध भागांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. जोरदार स्वागत त्यांचं ठिकठिकाणी केलं जात आहे. अशाच दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. सध्याची राजकीय परिस्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबत त्यांनी मुलाखतीत भाष्य केलं.

काय म्हणाले अमित ठाकरे ?
आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम करतो. लोकांपर्यंत पोहोचतो. कोणत्या पक्षाला कुणाची गरज आहे हे सांगता येणार नाही. मात्र महाराष्ट्राला आता राजसाहेबांची गरज आहे हे मला माहित आहे. आम्ही आता स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत. युती करायची की नाही, हा निर्णय राजसाहेब घेतील. गरज पडली तर मीसुद्धा निवडणूक लढवू शकतो. यापुढे ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा, प्रत्येक ठिकाणी मी प्रचारासाठी जाणार आहे,” असं उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं.

दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती होते. आदित्य ठाकरे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत आदित्य यांनी मोठ्या मताधिक्याने विजयही मिळवला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Share