हिंमत असेल तर आपण दोघेही ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊ! उदयनराजेंचे अजित पवारांना खुले आव्हान

सातारा : मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. मंत्री, संत्री कोण काय बोलले मला माहीत नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. आपण सगळे मिळून ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊया. पहिली माझी चौकशी करा. तुमच्यात दम असेल तर तुमची चौकशी करायला ईडीला सांगा, असे खुले आव्हान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता दिले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत, याचे कारण सांगताना अप्रत्यक्षपणे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर आरोप केले होते. अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खंडणीचा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपांना खा. उदयनराजे भोसले यांनी आज त्यांच्या खास स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे.

खंडणीच्या आरोपावर उदयनराजे संतापले

सातारा एमआयडीसीचा विकास खंडणी, टक्केवारी नेत्यांमुळे रखडला आहे. टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये टाका, असे सांगत अजित पवारांनी त्यांच्याकडे आलेला व्हिडीओ पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे देत चौकशी करण्याची सूचना केली होती. यावर खा.उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोल्लेख टाळून उदयनराजे म्हणाले, माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केल्यावर मी उत्तर दिले की, तो घरचा आहेर बोलले जाते; पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो. जे कोण काय बोलले मला माहिती नाही. मंत्री, संत्री असतील; त्याचे मला काहीही घेणे-देणे नाही. हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. लाख, दोन लाखाची खंडणी मागितल्याचा आरोप करण्याची काय पद्धत झाली काय? असा सवाल उदयनराजेंनी केला.

आपली स्टाईल इज स्टाईल
उगाच फालतू दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप करू नका. चिंधीचोर वाटलो काय? नखातली घाण काढून जगणारे आम्ही नाही. माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत. मी कशाला दोन लाखांची खंडणी मागेन. वेळ पडली तर भीक मागेन; पण खंडणी मागण्याचे काम करणार नाही. एखादा चांगले काम करत असेल तर त्याने कामच करायचे नाही का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, तुम्ही काम करा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात की लोक लुटारू आहात, हे एकदा ठरवा. सत्ता आज आहे आणि उद्या नाही. लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे काम आहे. ही लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील स्टाफही त्यांना ओळख देत नाही; पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल, असे म्हणत उदयनराजे यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये कॉलर उडवली.

त्यांची जबाबदारी नाही का?
साताऱ्यात एमआयडीसीची स्थापना झाली त्यावेळी मी तर शाळेत होतो, त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगून उदयनराजे म्हणाले, ज्यावेळी सातारच्या एमआयडीसीला परवानगी दिली त्यावेळी अन्य जिल्ह्यात एमआयडीसीची परवानगी दिली. तेथील परिस्थिती आज किती चांगली आहे. मग साताऱ्याची दयनीय अवस्था झाली त्यासाठी जबाबदार कोण आहे? तुमची पण जबाबदारी होती ना? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, उपमुख्यमंत्री आहात. त्यावेळी तुम्ही पालकमंत्री होतात. सातारा एमआयडीसी वाचवण्याची जबाबदारी सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांची होती. त्यावेळचे आमदार, खासदार यांची पण जबाबदारी होती, त्यांनी लक्ष का दिले नाही, माझ्यावरच का खापर फोडले जातेय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

१९७४ मध्ये सातारा एमआयडीचीसी स्थापना झाली. त्याच वेळी नगर एमआयडीचीसीचीही स्थापना झाली. आता सातारा एमआयडीची दुरवस्था का झाली. कोणी दुर्लक्ष केले? दुसऱ्यावर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार झाला. त्यावेळी एल ॲण्ड टी फॅक्टरी येणार होती, ती सिन्नरच्या माळावर का गेली हे आता त्यांनाच विचारा. येथील साईट सोडून बाहेरच्या जिल्ह्यात कंपन्या का गेल्या याला कोण कारणीभूत असा, प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.

Share